नवी दिल्ली, दि. १३ (वृत्तसंस्था) - ‘एक्झिट पोल’च्या अंदाजांमुळे घाम फुटलेल्या कॉंग्रेसमध्ये पराभवाचे खापर कोणाच्या माथी फोडायचे, यावरून घमासान सुरू आहे. कॉंग्रेसकडून ‘डोक्या’चा शोध सुरू असून, राहुल गांधींना पराभवाच्या नाचक्कीपासून वाचविण्यासाठी कॉंग्रेस नेत्यांमध्ये चढाओढच लागल्याचे केविलवाणे चित्र दिसत आहे. दरम्यान, निवडणूक निकालानंतर पक्षाने काय भूमिका घ्यायची यावर कॉंग्रेस हायकमांडकडून बैठकांचे सत्र सुरू आहे. १६ मे रोजी मतदानयंत्रे उघडली जातील तेव्हा कॉंग्रेसचा सफाया झालेला असेल. लोकसभा निवडणुकांच्या इतिहासातील कॉंग्रेसचा सर्वांत दारुण पराभव असणार आहे असाच अंदाज सर्व वृत्तवाहिन्यांच्या ‘एक्झिट पोल’मधून व्यक्त झाला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) बहुमताचे सरकार येणार, हे आता स्पष्ट 